विद्यापीठातील योजनांमध्ये सहभागी व्हा – डॉ. समय बनसोड.
बुधवार, 15 अक्टूबर 2025
Comment
• समर्थ महाविद्यालयात “विद्यापीठ आपल्या दारी” उपक्रमाची सुरुवात.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता ता की आवाज"
लाखनी :- दि.15 ऑक्टोबर 2025 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या “विद्यापीठ आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आज भगिनी निवेदिता सभागृहात वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. समय बनसोड, ज्ञानस्त्रोत व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. विजय खंडाळ, सिनेट सदस्य सुनील पुडके आणि मनीष वंजारी, तसेच डॉ. धनंजय गभने आणि डॉ. संगीता हाडगे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. धनंजय गभने यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व विशद करताना “विद्यार्थ्यांच्या दारी विद्यापीठ पोहोचवणे म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचा नवा अध्याय” असे नमूद केले.
प्रमुख अतिथी डॉ. समय बनसोड यांनी आपल्या प्रभावी भाषणात विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, “विद्यापीठाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व विद्यार्थी पात्र व्हावेत. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी या योजनेंतर्गत विद्यापीठाने 7 कोटी रुपयांपर्यंतचे प्रवाधन केलेले आहे. विद्यापीठ विद्यार्थीहितासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘गरुड झेप’ हे पुस्तक आणि विद्यापीठाचे मोबाईल ॲप विद्यार्थ्यांना योजना दाखवणारे साधन ठरतील.”
डॉ. विजय खंडाळ यांनी विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. तर सुनील पुडके आणि मनीष वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार मांडले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. दिगांबर कापसे यांनी सांगितले की, “विद्यापीठ स्वतः विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालयाच्या दारी येत आहे, ही मोठी अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या योजनांचा लाभ घेत आत्मविकास साधावा.”
कार्यक्रमादरम्यान वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथे होणाऱ्या “नागपूर पुस्तक महोत्सवा”च्या बॅनरचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. संगीता हाडगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अजिंक्य भांडारकर यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम” या गीताने झाली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
0 Response to "विद्यापीठातील योजनांमध्ये सहभागी व्हा – डॉ. समय बनसोड."
एक टिप्पणी भेजें