१४ ऑक्टोबर १९५६... साधारण २५०० वर्षानंतर... धम्मचक्र पुन्हा गतिमान झाले...
गुरुवार, 2 अक्टूबर 2025
Comment
संकलन
हर्षवर्धन देशभ्रतार
इ.स.पूर्व साधारण ५२८ मध्ये सारनाथ येथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्तीनंतर... धम्माचा केलेला पहिला उद्देश.. 'धम्मचक्र प्रवर्तन सूक्त'... दिन दलित गरीब उपेक्षितांन सह.. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्माच्या मार्गावर घेऊन आले... बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ लिहून... २५०० वर्षात झालेले धम्मातील विविध शाखा... विविध याने... त्यांची विचारधारा... अभ्यास करून... बुद्धाचा मानवतेचा धम्म वैज्ञानिक कसोटी वरती तपासून... शुद्ध करून...धम्मचक्र गतिमान करून गेले...
लेखक
विकी वामन येलवे.
इतिहासात काही क्षण असे घडतात, जे वेळेच्या पलीकडे जातात. ते नुसते एका राष्ट्राचे, एका समाजाचे, किंवा एका पिढीचे नसतात—ते संपूर्ण मानवतेचे ठरतात. १४ ऑक्टोबर १९५६. नागपूरची पवित्र दीक्षाभूमीवर
तो दिवस इतिहासातला तसाच एक अमर क्षण ठरला. तो दिवस महाराष्ट्रापुरता नव्हता.
तो दिवस भारता पुरता ही नव्हता.
तो होता मानवी सन्मानाच्या नव्या युगाचा उद्घोष करणारा दिवस! तो दिवस होता— हजारो वर्षांच्या गुलामगिरीला हादरा देणारा.
तो दिवस होता— तुडवल्या गेलेल्या उपेक्षितांच्या डोळ्यांत प्रकाश आणणारा.
तो दिवस होता— धम्मचक्र पुन्हा गतिमान झाल्याचा! बुद्धांचा प्रतिध्वनी सारणाथच्या मृगदावन येथील भगवान बुद्धांनी सर्वप्रथम जिथे धम्मचक्र फिरवलं तिथला... फक्त पाच भिक्खू ना भगवान बुद्धांनी तेथे धम्म सांगितला आणि मानव मुक्तीची धम्म ज्योत प्रज्वलित केली. चार आर्यसत्यांचा घोष घुमला: दुःख आहे. दुःखाचं कारण आहे. दुःखाचा अंत आहे. त्या अंताकडे नेणारा मार्ग आहे. हा नाद आशिया पर्यंत पसरला... नंतर जगभर विस्तारला.
संस्कृती घडवल्या, समाज घडवले. पण भारतातच तो धम्म काही भाग वगळता नष्ट झाला... धम्माच्या खानाखुना संपूर्ण भारतभर संपूर्ण आशियाभर स्तूप.. लेणी... मंदिरे आणि अनेक बुद्ध आणि बोधिसत्वांच्या मुर्त्या... दिसल्या.. वेगवेगळ्या देवी देवतांच्या नावाने प्रचलित झाल्या... धम्माचे वेगवेगळे विघटन होऊन वेगवेगळ्या नावाने तो पूजला जात होता.. तेव्हा जातींच्या लोखंडी बेड्यांनी लाखो कोटी लोकांच्या मानगुटीवर बसलेली अन्यायाची सावली
त्यांना ज्ञान, करुणा आणि स्वातंत्र्य मिळू देत नव्हती. इतिहास मात्र गप्प बसत नाही.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला भारताचे संविधान लिहिण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आली... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी... बौद्ध धम्मातील सार असलेलं समता आणि स्वातंत्र्य यांवर आधारित संविधान निर्माण केलं... त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रचताना बौद्ध तत्त्वज्ञान भारतीय संविधानात उतरवलं...त्यांनी बुद्धांच्या शिकवणीला न्यायिक भाषेत रूप दिलं. संविधानात समता (Equality) अनुच्छेद १४ ते १८ मधे सर्व नागरिकांना समानतेचा हक्क दिला. स्वातंत्र्य (Liberty)
धम्मात विचार, श्रद्धा आणि आचरण स्वातंत्र्य महत्वाचं आहे.
संविधानात अनुच्छेद १९ ते २२ मधून अभिव्यक्ती, सभा, धर्मस्वातंत्र्य लिहिलं. बंधुता (Fraternity)
बौद्ध धम्माचं मूळ तत्त्वच मैत्री, करुणा आणि बंधुभाव. संविधानाच्या प्रस्तावनेत "बंधुता" हेच मूल्य ठेवल, ज्यातून सामाजिक ऐक्य आणि मानवी सन्मान जपला. धम्म म्हणजे मध्यम मार्ग (Rule of Law, Balance)
बुद्धांचा "मध्यम मार्ग" म्हणजे टोकं टाळणं, संतुलित जीवन जगणं.
संविधानात लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता यांचं संतुलित मिश्रण करून बुद्धाने सांगितलेली करुणा आणि न्याय (Compassion & Justice) लिहून दीन दुबळ्यांसाठी करुणा दाखवली; संविधानात सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय देण्याची हमी असून सर्वांना समान हक्क भारतीय संविधानात माणसाला “मानवी प्रतिष्ठा” (Dignity of Individual) देण्यात आली. हेच बुद्धांच्या धम्मातील "आत्मसन्मान" (Self-respect) तत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं... संविधान म्हणजे न्यायालयीन चौकट, आणि धम्म म्हणजे जीवन मूल्यांची चौकट. पण दोन्हींचा उद्देश एकच मानवमुक्ती, समता, करुणा आणि शांती. हे लिहून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले (Adopted).
हा दिवस आज संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान देशभर लागू झाले... भगवान बुद्धांचा धम्म अप्रत्यक्षरीत्या धम्मचक्र गतिमान झालं होतं... देशाच्या तिरंग्यात... अशोकाचं धम्मचक्र आल होत...
काल पुढे सरकला.. संविधानाने बदल घडेल असं वाटलं होतं... जेवढा बदल हवा तेवढा दिसून येत नव्हता... हजारो वर्षाच्या उपेक्षित जीवनामध्ये जसं होतं तसं दिसत होतं... धर्मांतर शिवाय पर्याय नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी चांगलं जाणलं होत... येवल्याच्या परिषदेत घोषणाही करून झाली होती.. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.. म्हणूनच नागपूरच्या दीक्षाभूमीवर तोच नाद पुन्हा घुमला.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते फक्त राजकारणी किंवा सुधारक नव्हते,
ते होते मानवतेच्या दु:खाला कवेत घेणारे बोधिसत्त्व होते. १४ ऑक्टोबरला महास्थविर चंद्रमणी यांच्या उपस्थितीत
बाबासाहेबांनी त्रिरत्न व पंचशील स्वीकारले आणि उद्गार काढले—“मी हिंदू धर्माचा त्याग करतो. मी बुद्ध, धम्म आणि संघाचा शरण जातो.”ही केवळ वाक्ये नव्हती.
तो होता शतकानुशतकं चाललेल्या दास्याला दिलेला अंतिम निरोप! त्या क्षणी लाखो उपेक्षितांच्या डोळ्यांतून आलेले अश्रू... ते दु:खाचे नव्हते,... ते होते मुक्ततेचे अश्रू,.. आत्मसन्मानाचे अश्रू! .... होते...
बाबासाहेबांनी घेतलेल्या बावीस शपथांनी नव्या धम्मयुगाचा पाया रचला....
ब्रह्मा-विष्णूला, अवतार-दैवतांना, अंधश्रद्धा अंधविश्वासांना त्यांनी फेटाळलं.
आणि वैज्ञानिक, समतामूलक, करुणामय धम्माला नवी ओळख दिली. त्यांनी सांगितलं..
धम्म म्हणजे सम्यक आचरण.
धम्म म्हणजे प्रज्ञा.
धम्म म्हणजे स्वातंत्र्य व विज्ञानवाद.भगवान म्हणाले: “दुःखाचा अंत करा.”
बाबासाहेब म्हणाले: “अपमानाचा अंत करा.”भगवानांनी अष्टांगिक मार्ग दिला,
बाबासाहेबांनी त्याला सामाजिक क्रांतीचं रूप दिलं. नवीन युगाची पहाटतो दिवस फक्त स्मरणदिन नव्हता. तो होता ज्वलंत ऊर्जा देणारा दिवस. तो दिवस स्वतः सांगतो...
हा काळ गुलामीचा नाही तर स्वातंत्र्याचा आहे.
हा काळ अंधश्रद्धेचा नाही तर ज्ञानाचा आहे.
हा काळ अपमानाचा नाही तर आत्मसन्मानाचा आहे. पहिल्यांदा लाखो नव्हे,
तर लाखोंनी... गरीब, वंचित लोकांनी डोकं वर करून गर्वाने म्हटलं
“मी माणूस आहे. मी स्वतंत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेवढ्या वरती थांबले नाही... २५०० वर्षांपूर्वी स्थापन झालेला भगवान गौतम बुद्धांचा धम्म आजपर्यंत वेगवेगळ्या शाखांमध्ये वेगवेगळ्या यानांमध्ये विभागला गेला होता वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये विभागला गेला होता. या सर्व शाखांचं यानंतर अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा मुख्य उद्देश शोधून काढला तो वैज्ञानिक कसोटी वरती तपासून पाहिला... आणि "बुद्ध आणि त्यांचा धम्म" ग्रंथ स्वरूपात लिहून धम्माला पुन्हा शुद्ध स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवलं... आज देखील बुद्ध वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या आधारेच आम्ही तपासून घेतो त्यालाच प्रमाण मानतो.... वैज्ञानिक कसोटी वरती धम्म कसा तपासायचा.... आज देखील बाबासाहेबांच्याच मुळे आम्हाला समजतो....
६ डिसेंबर १९५६ रोजी.. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. दिल्ली आकाशवाणीवरून बातमी आली आणि संपूर्ण देश स्तब्ध झाला. गावागावांत चूल पेटली नाही.
लोक मुंबईकडे ओढले गेले.
हजारो माणसांची हृदये एकाच वेळी ओरडत आक्रोश करून डोळ्यातून अश्रू वाहत... अंतकरणापासून बोलत होती..
“आमचे बाबा आम्हाला सोडून गेले!” लोक रडले, आक्रोश केला, पण त्याच वेळी धीराने शपथ घेतली
बाबासाहेबांच्या दाखवलेल्या धम्ममार्गावर चालण्याची. अत्यंत करुण क्षणी हजारो ... लाखो आवाज एकसारखे घुमले—गावागावात चौका चौकात.. शहराच्या मुख्य रस्त्यावरती.... खाजगी आणि सार्वजनिक ठिकाणी सर्व भारतभर... एकाच आवाजात
बुद्धं शरणं गच्छामि...
धम्मं शरणं गच्छामि...
संघं शरणं गच्छामि... बुद्ध वंदना होत होती... आणि मग गावोगावी, घराघरांत स्वयंस्फूर्तीने लोक बुद्धधम्मात दीक्षित होत होते....
भीषण उपेक्षेतून, वेदनेतून मुक्त होत.. लोक
बौद्ध होत होते... होत होते... होत होते...अखेरचा प्रणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करत होते.... धम्मचक्र पुन्हा गतिमान आपापल्या परीने करत होते... आजही दीक्षाभूमीच्या मातीतून तोच आवाज घुमतो—
“बुद्धम् शरणम् गच्छामि...
धम्मम् शरणम् गच्छामि...
संघम् शरणम् गच्छामि...”मानवी मुक्तीच्या जयघोषात तो आवाज अखंड गुंजत राहील...
जोवर एकही उपेक्षित या भूमीवर उरलेला आहे. बाबासाहेबांनी दाखवलेलं धम्मचक्र अनंत काळपर्यंत फिरत राहील
शांततेसाठी, समतेसाठी, माणुसकीसाठी!
लेखक
-विकी वामन येलवे
वकील उच्च न्यायालय मुंबई
0 Response to "१४ ऑक्टोबर १९५६... साधारण २५०० वर्षानंतर... धम्मचक्र पुन्हा गतिमान झाले..."
एक टिप्पणी भेजें