आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिन संपन्न.
मंगलवार, 14 अक्टूबर 2025
Comment
•विद्यार्थी जीवनात आपत्ती व्यवस्थापन महत्वाचे - जिल्हाधिकारी प्रजित.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
गोंदिया :- विद्यार्थी जीवनात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे शिकून आपत्ती निवारणासाठी विद्यार्थ्यांची भूमिका मोलाची ठरु शकते. आपत्तीची तीव्रता कमी करुन जिवित व वित्तीय हानी कमी करण्यास मदत होऊ शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज 'आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिन' साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, आज १३ऑक्टोबर२०२५ रोजी संपूर्ण जगात 'आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिन' साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन २००६ मध्ये स्थापन करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीत स्वतःचा जीव वाचविण्यसाठी आपण काय केले पाहिजे, तसेच पूर आला तर पायाभुत (Basic) उपाययोजना काय करायला पाहिजे याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना अवगत असली पाहिजे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकाचे ज्ञान संपादन करुन आपल्या कुटुंबासह मित्र-मैत्रीणी, परिचित व्यक्तींना ऐनवेळी आलेल्या प्रसंगात समयसुचकता वापरुन आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.'आपत्ती'चा अर्थ समजवत ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जिवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात अशा संकटाला आपत्ती म्हणतात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
आपत्ती व्यवस्थापनाचे ३ प्रमुख टप्पे आहेत,
ते पुढील प्रमाणे. आपत्ती पूर्व व्यवस्थापन- यामध्ये प्रशिक्षण, जनजागृती उपक्रम, यंत्रणाचा सराव व प्रात्यक्षिक, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विविध आपत्ती प्रतिसाद दलांशी संपर्क व समन्वय ठेवणे. आपत्ती प्रसंगी व्यवस्थापन-प्रत्यक्ष आपत्कालीन प्रसंगी मदत कार्याचे नियोजन करणे व मदत यंत्रणामध्ये समन्वय राखणे. आपत्ती नंतरचे व्यवस्थापन-आपत्ती नंतर करावे लागणारे मदत कार्य नियंत्रित करणे, मदत व पुनर्वसन योजनेची योग्य अंमलबजावणी करणे.
हेल्प लाईन :- कंट्रोल रुम कामकाज २४ X ७, जिल्हाधिकारी कार्यालय ०७१८२-२३०१९६, टोल फ्री क्रमांक १०७७ (बीएसएनएल), भ्रमणध्वनी क्रमांक ९४०४९९१५९९ (व्हॉट्सअॅप नंबर), ई-मेल आयडी- [email protected] अशाप्रकारे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे हेल्पलाईन नंबर आहेत. यावर आपत्तीच्या समयी संपर्क करुन मदत मागता येऊ शकते.
आपत्ती व्यवस्थापन संरचना :- NsDMA- राष्ट्रीय आपत्ती
निवारण दल .
यावर आपत्तीच्या समयी संपर्क करुन मदत मागता येऊ शकते. SDMA- जिल्हा निवारण आपत्ती दल.
जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदिया यांच्याकडून आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन गोंदियाचे बोधचिन्हाचे अनावरण जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शोध व बचाव पथकातील कर्मचारी दुर्गादास रंगारी, नरेश उईके, जसवंत रहांगडाले, संदिप कराडे, दिनू दिप, अमित मेश्राम, मुकेश अटरे, इंद्रकुमार बिसेन यांना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते गणवेश व संच वितरीत करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन संगणकीकृत सादरीकरणाद्वारे आपत्ती व्यवस्थापन बाबत उपस्थितांना विस्तृतपणे माहिती दिली. यावेळी अग्नीशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर यांनी आग लागल्यानंतर त्यापासून बचाव कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर माहिती दिली.याप्रसंगी नैसर्गिक आपत्तीमध्ये उपयोगात येणारे रबर बोट, फायबर बोट, लाईफबॉय, लाईफ जाकेट, रिमोट ऑपरेटेड लाईफबॉय, गुंडफळी, जलपरी, रिकाम्या बॉटल पासून तयार केलेला बेल्ट, दोरगुंड, घरगुती थर्माकोलपासून तयार केलेले लाईफ जाकेट इत्यादी साहित्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमास अग्नीशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, प्रा.डॉ. शशीकांत कडू, डॉ. अंकीतकुमार जयस्वाल, सर्वश्री प्राध्यापक निलकंठ भेंडारकर, शुभांगी दडमल, विजय पोचाटे यांचेसह एन.एम.डी. महाविद्यालय गोंदिया येथील विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंद्रकुमार बिसेन, स्मिता शेटे व संजय लाडे यांनी परिश्रम घेतले.
0 Response to " आंतरराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण दिन संपन्न. "
एक टिप्पणी भेजें